सर्टिफिकेट
मध्यंतरी एकाच्या घरी गेलो होतो.
आम्ही गप्पा मारत असतानाच त्याचे
‘इयत्ता तिसरी ब’ - दर्जाचे चिरंजीव
शाळेतून घरी आले. आल्या
आल्या त्याने दप्तरातून एक सर्टिफिकेट काढले
आणि कौतुकाने दाखवले. पाहिले तर शाळेच्या कुठल्यातरी
छोट्या सहलीमध्ये भाग घेतल्याबद्दलचे होते
ते. मी चाट पडलो.
नुसतं सहलीला आल्याबद्दल सर्टिफिकेट! तेही दुसरी तिसरीच्या
मुलांना?
पण काहीही म्हणा,
आजकाल सर्टिफिकेटचा अक्षरशः बाजार झालाय! काही सन्माननीय
अपवाद सोडले तर उठेल
तो, उठेल त्याला सर्टिफिकेट
देत सुटतोय. कुठलीतरी छोटी-मोठी स्पर्धा
किंवा कार्यक्रम ठेवायचा. जिंकलेल्यांना तर सर्टिफिकेट द्यायचेच,
पण न जिंकलेल्यांनाही, परीक्षकांना,
आयोजकांना, प्रेक्षकांना सगळ्यांना सर्टिफिकेट्स! कशाकरता आम्हाला
देता, असं कोणी विचारलं
तर ‘सहभागाबद्दल’ असं उत्तर मिळतं.
बरं, ते सर्टिफिकेट्स
असे एकदम साधे नसतात,
छान ग्लॉसी फोटो पेपरवर, रंगीबेरंगी
छान डिझाईनचे, खाली चार पाच
सह्यावाले असतात. ठेववत नाही आणि फेकवतही
नाही.
एक काळ असा
होता एक सर्टिफिकेट मिळवायला
प्रचंड मेहनत करून कुठल्यातरी स्पर्धेत
वा परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवले तरच सर्टिफिकेट हाती
लागायचे. त्याच्या छपाईचा दर्जा उच्च नव्हता, पण
ते मिळवण्याची धडपड उच्च दर्जाची
लागे.
आजकाल
उत्तेजनार्थ काहीतरी करत राहणे बऱ्याचदा आवश्यक ठरतं व तसे ते करावे देखील. पण
तिथे तारतम्य सांभाळून त्याचा अतिरेक टाळावा,
इतकेच.
हे केवळ सर्टिफिकेट
पुरतंच नाही, छोटे मोठे मेमेंटो,
ट्रॉफीवजा काहीतरी लाकडाचे, प्लॅस्टिकचे, अगम्य शिल्पकलेचे नमुने दिले जातात. तेही
मग घरात इकडेतिकडे लोळतात.
‘अति परिचयाते अवज्ञा’चे हे सर्टिफिकेट
आणि मेमेंटो हे सर्वात चांगले
उदाहरण ठरावे.
सर्टिफिकेट देणे घेणे हा
राजीखुशीचा मामला असल्याने ते देण्याला वा
घेण्याला कुठलाही निर्बंध नाही. हे असंच पुढे
चालू राहिलं तर कोणीही, कशासाठीही
सर्टिफिकेट देतील.
- तुम्ही
मागच्या दोन आठवड्यात एकही रजा घेतली नाही
- घ्या सर्टिफिकेट!
- क्रिकेटची
मॅच बघायला स्टेडियमवर आलात - घ्या हे सहभागाचे
सर्टिफिकेट!
-
हे पर्यटन स्थळ बघितलंत –
घ्या हे फोटोसकट सर्टिफिकेट!
एवढंच काय, एखाद्या सर्टिफिकेटचे डिझाईन बनवल्याबद्दल आणि
ते छापल्याबद्दल तेच सर्टिफिकेट ते सर्टिफिकेट बनवणाऱ्या आणि छापणाऱ्याला द्यायलाही
कोणी कमी करणार नाही.
© सुनील भातंब्रेकर, पुणे
संपर्क- ९८९०६२०९४९
*****
Comments
Post a Comment