रंग जांभळा
रंग जांभळा © सुनील भातंब्रेकर रंगाला जर स्पर्श करता आला असता तर सगळ्यात मुलायम रंग जांभळा लागला असता. जांभळा रंग बनवायला निसर्गाला प्रचंड कष्ट पडले असणार. लाल , काळा , निळा , थोडा गुलाबी , हलकासा किरमिजी , तपकिरी अशा बऱ्याच रंगांचे मिश्रण केल्यानंतर जसे एखादे स्वयंपाकघरातले व्यंजन बनावे , तसा हा जांभळा रंग बनला आहे ; जणू विविध प्रकारचे मसाले , हळद , तिखट , नैसर्गिक रंग टाकून एक अत्यंत सुंदर चविष्ट पदार्थ बनवावा! अतिशय संवेदनशील , भावनोत्कट , कवी मनाच्या व खूप सर्जनशील वृत्तीच्या लोकांचा हा आवडता रंग असतो , तो त्यामुळे! जांभळा रंग माणसामाणसातले अंतर कमी करतो. भिंतीला हा रंग असेल तर त्या खोलीत बसून बोलणाऱ्याला अंतरीचे गुह्य सांगावेसे वाटते. ही त्या रंगाची जादू आहे. हृदय सर्वांनी बघितलंय , त्याचा रंगही सगळ्यांना माहिती आहे. लाल , गुलाबी रंगाचे ते मिश्रण असते. पण अंतःकरण कोणीच पाहिलं नाही. कारण ती एक भावना आहे. म्हणून मला वाटते की , उद्या जर अंतःकरणाचा रंग कुठला असा प्रश्न पडला तर बिनधास्तपणे सांगा - जांभळा! दुसरा असूच शकत नाही! ह्या जांभळ्याची बातच न्यारी असते. चार लोका...