भाषण

 

भाषण

- © सुनील भातंब्रेकर

‘मित्रांनो, असं म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर असतो - परमेश्वर सृष्टीचा निर्माता आहे - निर्माता दिग्दर्शक नाटकसिनेमाला असतो - दिग्दर्शक चित्रपटाला योग्य दिशा देतो  - दिशा एकूण दहा असतात -  रावणाला  दहा तोंडे होती - रावण श्रीलंकेचा राजा होता -  श्रीलंका 2019 मध्ये वर्ल्ड कप क्रिकेटचा विजेता होता - कप चहा पिण्यासाठी प्रसिद्ध आहे - सर्वात चांगला चहा दार्जिलिंगचा समजला जातो - दार्जिलिंग मधून कांचनजुंगची  पर्वतरांग दिसते - कांचनजुंग विश्वात तिसऱ्या क्रमांकाच्या उंचीचा पर्वत आहे – ‘ये पर्बतों के दायरे’ या गाण्याचा संगीतकार चित्रगुप्त होता - चित्रगुप्त ब्रह्मदेवाचा सतरावा मानसपुत्र आहे -  सतरा ही पहिल्या चार मूळ संख्येची सर्वात लहान बेरीज आहे - मूळसंख्येला इतर कशानेही भाग जात नाही - वाहनांना खूप सुटे भाग लागतात - मूषक गणेशाचे वाहन आहे - गणेशाचे आवडते खाद्य दुर्वा आहे – ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे बाळ कोल्हटकर यांचे नाटक प्रसिद्ध आहे - बाळ ज. पंडित मराठीतले क्रिकेटचे समालोचक म्हणून प्रख्यात होते - पंडित म्हणजेच विद्वान लोक - विद्वान सर्वत्र पुज्यते – ‘सर्वत्र’  हा भारतीय सेनेने बनवलेला अस्थायी पूल होता - पूल श्रीमंतांचा खेळ समजला जातो - श्रीमंती ही मनाची हवी - मनाचे श्लोक समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले आहेत - रामदास स्वामींची समाधी सज्जनगडावर आहे - सज्जन चरित्र अभिनेत्याची भूमिका करत - भूमिका या चित्रपटाचे दिग्दर्शक शाम बेनेगल होते - श्यामची आई आचार्य यांचा चित्रपट होता – ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असे म्हणतात – ‘जग हे बंदीशाळा’ हे सुधीर फडके यांचं गाणं आहे - बंदिशाळा नाही, तर शाळा मुलांना घडवते - मुलात मूल आईचे तर फुलात फुल जाईचे – ‘जाई तिथे खाई’ असे काहीजण असतात – ‘खाईके पान बनारसवाला’ गाणं तुम्हाला माहीतच असेल - बनारस म्हणजेच काशी वाराणसी - काशी हे हिंदूंचे पवित्र क्षेत्र आहे – ‘पवित्र पापी’ नावाचा  सिनेमा होता  - पाप दूर करायचे असेल तर गायीचे दर्शन घ्यावे - गाय एक गरीब प्राणी आहे - गरीब लोकांची  गरिबी दूर करायची असेल तर मला निवडून द्या!

***

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

काना मात्रा वेलांटी उकार

रंग जांभळा

रंग पांढरा