शुभहस्ते

 शुभहस्ते

- © सुनील भातंब्रेकर

आपली मराठी भाषा समृद्ध-संपन्न असण्याचे प्रमुख कारण म्हणजे ती संस्कृतोद्भव आहे. त्यामुळे एखाद्या दागदागिन्यांनी नटलेल्या लावण्यवती त्रैलोक्यसुंदरीने साधी रेशमी साडी व दोन-चार मोजकेच दागिने घातले तरी तिचे सौंदर्य लपत नाही, तसे या संस्कृत आणि मराठी भाषेचे आहे. ह्यातले मोजके दागिने म्हणजेच मराठी भाषेतले संस्कृत शब्द! जरी ही वेगळी व स्वतंत्र भाषा गणली जात असली तरी मराठीत खूप संस्कृत शब्द अजूनही सर्रास वापरले जातात.

त्यातलाच हा ‘शुभहस्ते’ हा शब्द आहे. कुठल्याही कार्यक्रमाचे उद्घाटन, प्रकाशन, दीपप्रज्वलन यासारख्या बाबी ज्या प्रमुख पाहुण्यांच्या हातून करतात त्या पाहुण्यांचा तो हात हमखास ‘शुभहस्त’च असतो.  इथे ‘शुभ हातांनी’, ‘शुभ करांनी’ वगैरे चालत नाही - केवळ हस्तच! क्वचित कधीतरी तो पाहुणा त्या हातांनी सर्वांच्या नकळत कितीही काळे धंदे वगैरे करत असलेला निघाला तरी उद्घाटनाला आला  कि ते कृष्णकृत्य करणारे हात लगेच शुभहस्त होतात! बरं, हा शब्द केवळ जाहीरपणे बोलतानाच वापरत नाहीत, सहज गप्पा मारताना ही तो शुभहस्तच असतो! ‘अरे, काय सांगू, ते पाहुणे आलेच नाहीत! ऐन वेळेस ऑफिसमधल्याच राम्याला - सॉरी - रामरावांना बोलवलं! तोही मोकळा होता! अंगावरच्या साध्या कपड्यावरच आला उद्घाटनाला. त्याच्याच शुभहस्ते रिबीन कापली मग! काय करणार?’ तेव्हा त्या साधारण रामराव यांचे  हात फक्त कार्यक्रमापुरतच शुभहस्त होतात आणि लगेच नॉर्मल हात होतात.

कधीकधी कार्यक्रमाचे सूत्रसंचालकही या ‘शुभहस्ते’चा अतिरेक करतात – ‘मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभहस्ते सरस्वतीच्या फोटोला हार घालावा व नंतर आपल्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करावे, दीपप्रज्वलन झाल्यानंतर आपल्या शुभहस्ते नारळ फोडावे व मग आपल्या शुभहस्ते पुस्तक प्रकाशन करून त्याच शुभहस्ते पहिल्या पाच प्रतींचं वितरण करावं!’  एवढं शुभ हस्ते झाल्यावर त्या ‘हस्ते’ ‘हसते’ नाही झालं तरच नवल!

या ‘शुभहस्ते’च्या जोडीचा शब्द म्हणजे ते ‘हस्तांदोलन’! आता नुसतंच हातात हात मिळवण्यासाठी आंदोलन कशासाठी? पण हे हँडशेक मधल्या ‘शेक’चं ‘आंदोलन’ असं उगाच भारी वाटावं असं भाषांतर असावं. या सरळ साध्या हँडशेक ला कर-मेलन किंवा हातमिळवणी असं साधं भाषांतर न वापरता हस्तांदोलना सारखा क्लिष्ट शब्द वापरण्या मध्ये या क्रियेचे महत्त्व विनाकारण वाढवलं आहे. यामध्ये कोणी बदल करायला गेलं तर लगेच त्याला ‘तू नको हस्तक्षेप करू’ असं म्हणून परत ‘हस्ता’लाच हाताशी धरलं जातं! नुसत्या आक्षेपामध्येच हस्ताला आणत नाहीत तर कलेमध्ये ‘हातकला’ म्हणण्याऐवजी ‘हस्तकला’ असं म्हणून त्या हाताचा भाव वधारला जातो. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या हाताचे ‘हस्त’ व्हावेत असे वाटत असेल, तर त्या हातांकडून काहीतरी विशेष कार्य करून घ्यावे लागते!

 कला, उद्घाटन वगैरे जाऊ द्या, त्याला काहीतरी हातात विशेष असावं लागतं. कमीत कमी तुम्ही कोणाशी हात तरी मिळवा – बघा, त्याचे लगेच हस्तांदोलन होऊन तुमच्या हाताचे कसे छान ‘हस्त’ होतात की नाही!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

काना मात्रा वेलांटी उकार

रंग जांभळा

रंग पांढरा